जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातील वाहतुकधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बायपासवरील तरसोद ते पाळधी दरम्यानच्या आसोदा रेल्वे पुलाचे नुकसान झाले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती अद्याप सुरू असल्याने जळगावमधील वाहतूक वळवण्याच्या (डायव्हर्शन) मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पत्रानुसार, धुळेकडून नागपूरकडे जाणारा एकेरी मार्ग आता १२ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ०६ ऑगस्टच्या रात्री १२:०० वाजल्यापासून ते १२ ऑगस्ट २०२६ च्या रात्री १२:०० वाजेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत.

३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाळधी-तरसोद बायपासवरील आसोदा रेल्वे पुलावरील रस्त्याला मोठमोठ्या भेगा व भरावाच्या सिमेंटच्या प्लेट खचल्याने वाहतूक शहरातील महामार्गावरून वळवण्यात आली. यामुळे शहरातील मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असून धुळेकडून नागपूरकडे जाणारा एकेरी मार्ग १२ ऑगस्टपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यामुळे वाहतुकीचे डायव्हर्शन आणखी सात दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने ६ ऑगस्ट रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून ते १२ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत तात्पुरता बदल लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वाहतुकीची कोंडी टाळणे, अपघात रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
असे राहणार पर्यायी मार्ग
भुसावळ/नागपूरकडून धुळे/मुंबईकडे जाणारी वाहने : भुसावळ – तरसोद फाटा – काळिका माता मंदिर – अजिंठा चौफुली – आकाशवाणी चौक – शिवकॉलनी – बांभोरी पूल – पाळधी – धुळे.
मुंबई/धुळेकडून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने : पाळधी – बांभोरी – शिवकॉलनी – आकाशवाणी चौक – अजिंठा चौफुली – काळिका माता मंदिर – तरसोद फाटा – भुसावळ.
छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जाणारी वाहने : छत्रपती संभाजीनगर – पहूर – जामनेर – नाहाटा चौफुली – भुसावळ – नागपूर.
नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने : नागपूर – भुसावळ – नाहाटा चौफुली – जामनेर – पहूर – छत्रपती संभाजीनगर.
इंदूर/बडोदा/नंदुरबारकडून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने : चोपडा – अडावद – यावल – भुसावळ – नागपूर.
नागपूर/भुसावळकडून नंदुरबार/बडोदा/इंदूरकडे जाणारी वाहने : भुसावळ – यावल – अडावद – चोपडा.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.












