जळगावात २ ऑगस्टला ‘सुहीनी जोडी’ सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

जुलै 29, 2026 4:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र शासन) आणि भारतीय सिंधू सभा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुहीणी जोडी क्रमांक १’ या विशेष सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिश्तों में संस्कार, समाज में परिवर्तन’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे होणार आहे.

suhini jodi

सिंधी संस्कृतीचे जतन करणे आणि आजच्या पिढीत योग्य संस्कार रुजवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कलागुण सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी जोडप्यांना कुटुंब आणि समाजाला सकारात्मक संदेश देणारे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ १२ जोडप्यांची निवड करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या मुख्य परीक्षक म्हणून प्रसिद्ध सिंधी अभिनेत्री, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर रोशनी होतवानी (उल्हासनगर) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गुरुमुख जगवानी उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मूलचंद उदासी असून, आयोजनाची जबाबदारी सचिन निंबाळकर यांच्याकडे आहे.

स्पर्धेत सहभागी जोडप्यांना ४ ते ५ मिनिटांचे सामाजिक संदेश देणारे सादरीकरण करावे लागणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून, प्रथम क्रमांकासाठी ₹११,०००, द्वितीयसाठी ₹७,००० आणि तृतीयसाठी ₹५,००० इतकी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागींसाठी आकर्षक भेटवस्तू आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, सिंधी समाजासह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now