शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ

राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतले.

जुलै 28, 2026 9:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक विशेष तपास पथकाने (SIT) सोमवारी (दि. २७) उशिरा रात्री मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील भाजप नेते व शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला नवे वळण मिळाले असून प्रकरणातील अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

sanjay garud 1

जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर याला यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. हिंगोणीकरने आपल्या पदाचा गैरवापर करत २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य मान्यता दिली होती. या चौकशीदरम्यान हिंगोणीकरने दिलेल्या महितीच्या आधारे एसआयटीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, नियमबाह्य मान्यता मिळालेल्या शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षक हे संजय गरुड यांच्याच शाळेतील असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.

१६० कोटींची आर्थिक फसवणूक; सर्वाधिक आरोपी जळगावचे

बनावट शालार्थ आयडी तयार करून तब्बल १६० कोटी रुपयांचा शासननिधी हडपल्याचा आरोप या रॅकेटवर आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यातील एकूण ४८१ संशयित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४३८ जण एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आंतरजिल्हा रॅकेटमध्ये संजय गरुड हे महत्त्वाचा दुवा असल्याचे तपासात समोर आले आहे.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

संजय गरुड यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. जामनेर तालुक्यातील एका वजनदार नेत्यालाच थेट साताऱ्यातून अटक झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now