जळगावात चातुर्मास पर्वाला आजपासून प्रारंभ

जुलै 28, 2026 8:53 AM

धार्मिक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल, भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जळगाव यांच्या वतीने मंगळवार, २८ जुलैपासून चातुर्मास पर्वाची सुरुवात होत असून, यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जैन समाजातील सर्व श्रावक-श्राविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून जिनवाणी श्रवण, दर्शन, वंदन तसेच धर्मचर्चेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चातुर्मास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Chaturmas

जिनशासन गौरव परमपूज्य आचार्य प्रवर १००८ श्री हीराचंद्रजी महाराज साहेब व भावी आचार्य श्री महेंद्रमुनिजी महाराज साहेब यांच्या आज्ञेनुसार तत्त्वचिंतक श्रद्धेय श्री प्रमोदमुनिजी महाराज साहेब आदी ठाणा ८ हे रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवन, गणपती नगर येथे चातुर्मासासाठी विराजमान आहेत. तसेच व्याख्यात्री महासती श्री इंदुबाला जी महाराज साहेब आदी ठाणा १२ या बाफना भवन, गणपती नगर येथे विराजमान आहेत.

चातुर्मास पर्वानिमित्त श्रावकांसाठी रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवन येथे, तर श्राविकांसाठी सौ. माया रमेशजी मुणोत भवनातील पौषधशाळेत पौषधाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक कार्यक्रमानुसार सूर्योदयानंतर सकाळी ६.१० वाजता अनुज्ञा व प्रार्थना होणार असून, सकाळी ७ ते ८ या वेळेत धार्मिक वर्ग घेतला जाणार आहे. सकाळी ८.४५ ते ९.५५ या वेळेत जिनवाणी प्रवचन, दुपारी १.३० ते २.३० सूत्र वाचन, त्यानंतर २.४० ते ३.३० धार्मिक श्रवण, ३.३० ते ३.५० वैयक्तिक गुरुसेवा, सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रतिक्रमण, त्यानंतर स्तोत्र, गुरुभक्ती व प्रार्थना तसेच रात्री ८.४५ ते ९.४५ या वेळेत विशेष धर्मचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय, प्रत्येक रविवारी सकाळी १०.३० वाजता मुलांसाठी इंग्रजी माध्यमातून विशेष धार्मिक वर्ग घेतला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी २७ जुलैपासून वाहन व्यवस्थाही सुरू करण्यात आली आहे. तसेच संत निवास आणि उपाश्रय परिसरात प्रवेशाबाबत काही वेळा व नियम निश्चित करण्यात आले असून, भाविकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चातुर्मासातील सर्व धार्मिक कार्यक्रम रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवन येथे पार पडणार असून, जैन समाजातील सर्वांनी सपरिवार उपस्थित राहून गुरु भगवंतांचे दर्शन, जिनवाणी श्रवण आणि धर्मचर्चेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चातुर्मास समितीचे अध्यक्ष दलीचंद जैन, प्रमुख मनीष ईश्वरलाल जैन तसेच श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now