जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील साईनगर येथील खुल्या मैदानावर काही मुजोर नागरिकांकडून चारचाकी वाहनांची अवैध पार्किंग केली जात असून, खेळणाऱ्या चिमुकल्यांना दमदाटी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी संतप्त नागरिकांनी आणि पालकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे धाव घेत २४ जुलै रोजी निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत महापौरांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमका प्रकार काय?
साईनगर (गट क्र. ११५/२, निमखेडी शिवार, प्रभाग क्रमांक ९) येथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी आणि वृद्ध नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी खुले मैदान आरक्षित आहे. या ठिकाणी सकाळी व सायंकाळी लहान मुले, तरुण खेळण्यासाठी व व्यायामासाठी येतात, तर वृद्ध नागरिक विश्रांतीसाठी येतात. मात्र, काही मुजोर नागरिकांनी या मैदानाचा वापर अवैध पार्किंगसाठी सुरू केला आहे. खेळताना चुकून मुलांकडून वाहनांचे काही नुकसान झाल्यास, पालकांना धाकधपटशाही दाखवून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. “हे मैदान मुलांच्या खेळासाठी आहे की अवैध पार्किंगसाठी?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेले चारही बाजूंचे तारेचे कंपाऊंड काही मोजक्या मुजोर नागरिकांनी मोडून टाकले आहे. ही जागा स्वतःच्या मालकीची असल्याचा आव आणून तेथे खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांना व नागरिकांना हुसकावून लावले जात आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या निवेदनावर प्रतिक्रिया देताना महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट केले की, साईनगर भागातील या मैदानाची लवकरात लवकर पाहणी करण्यात येईल. ज्या नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी तारेचे कंपाऊंड तोडले आहे आणि जे लोक मैदानात अवैधरित्या वाहने पार्क करत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. खुले मैदान हे केवळ मुलांच्या खेळासाठी असते, त्यावर कोणालाही पार्किंग करण्याचा अधिकार नाही. तसेच, भविष्यात खेळताना वाहनांचे काही नुकसान झाल्यास त्याला कोणतीही पालक किंवा मूल जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.











