जळगाव लाईव्ह न्यूज । तहसील कार्यालय जळगाव व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहर मतदारसंघासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल हॉल, लेवा भवन येथे करण्यात आले. शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ देत एकूण ६३५ लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर ७०२ नागरिकांनी शिबिरास भेट देऊन विविध सेवांचा लाभ घेतला.

कार्यक्रमास जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे , महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह सभापती सिंधुताई कोल्हे, नगरसेवक विष्णु भंगाळे व प्रकाश बालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विनय गोसावी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त पंकज गोसावी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. तर कार्यक्रमाचे नियोजन तहसीलदार शितल राजपूत यांनी केले.

शिबिरामध्ये महसूल, महानगरपालिका, महिला व बाल विकास, पुरवठा विभाग तसेच इतर विविध विभागांमार्फत नागरिकांना सेवांचा लाभ देण्यात आला. महानगरपालिकेमार्फत ०७ जन्म प्रमाणपत्रे, ११ मृत्यू प्रमाणपत्रे, ५० आयुष्मान कार्ड तसेच०३ बचतगट कर्ज वितरण करण्यात आले. महिला व बाल विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत ३७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पुरवठा विभागामार्फत १०३ प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिका तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ०७ फिरती शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.
महसूल विभागामार्फत ४७ सिंधी विस्थापित आदेश, ६० जातीचे दाखले, १०२ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रे, ७७ अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्रे, ०९ उत्पन्न प्रमाणपत्रे, ०५ विमुक्त जाती व भटक्या जमातींची जात प्रमाणपत्रे,५५ जिवंत ७/१२ उतारे तसेच ०४ कडेबंदी स्थानिक क्षेत्राशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच ३७ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिरासही नागरिकांनी प्रतिसाद दिला. तसेच एस.टी. महामंडळामार्फत एनसीएमसी कार्ड सुविधा, आधार सेवा, सेतू सुविधा तसेच कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य आणि भूमी अभिलेख विभागांच्या विविध योजना व सेवांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
संजय गांधी शहर शाखेच्या वतीने तहसीलदार रुपाली काळे तसेच नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनीही विशेष प्रयत्न केले. यावेळी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड व धनश्री शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







