जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२६ । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वेगवान घडामोडी आणि बदलांमुळे सध्या मौल्यवान धातूंच्या किमतीत कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान जळगावच्या सुवर्णबाजारपेठेत अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दराने मोठी गरुडझेप घेतली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांसह व्यापारी वर्गातही मोठी खळबळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील युद्धजन्य परिस्थिती, डॉलरमधील चढ-उतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली आहे. अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दराने मोठी गरुडझेप घेतली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांसह व्यापारी वर्गातही मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या २४ तासांत सोन्याच्या दराने प्रति तोळ्यामागे तब्बल ₹४,१५४ ची वाढ नोंदवली गेली. काल दिवसभरातील तेजीनंतर आज सकाळी सोन्याचे दर प्रति तोळा १,४६,०५४ रुपयांवर पोहोचले आहेत. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याने घेतलेल्या या ऐतिहासिक भरारीमुळे खरेदीदारांचे बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे सोन्याचे दर गगनाला भिडले असताना, चांदीने मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात ३,०९० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचा दर प्रति किलो २,२६,६०० रुपयांवर येऊन पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणाव, जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या मूल्यात होणारे बदल यांमुळे सोन्या-चांदीच्या दरात एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना (सोन्यात तेजी आणि चांदीत मंदी) हालचाल पाहायला मिळत आहे. आगामी दिवसांतही हे चढ-उतार असेच सुरू राहण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे.
दरम्यान, सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने सराफ बाजारात ग्राहकांची हालचाल वाढू लागली आहे. मात्र सोन्याच्या वाढत्या दरामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.












