जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु पाणी प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढली आहे. ‘मंगरूळ’ धरण आधीच पूर्ण भरले असताना, आता ‘अभोडा’ धरणही १०० टक्के भरले आहे. तसेच ‘सुकी’ धरण ९७ टक्के भरले असून तेही ओव्हरफ्लो होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

जूनची चिंता जुलैमध्ये मिटली!
यावर्षी मान्सूनचे आगमन लांबल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला होता. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धुवांधार बॅटिंग केल्यामुळे धरणांमधील चित्रात कमालीची सुधारणा झाली आहे. या वाढलेल्या जलसाठ्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, शेतीसाठीच्या सिंचनाचा मार्गही मोकळा झाला आहे.

सध्या जिल्ह्यातील मंगरूळ आणि अभोडा हे दोन्ही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सुकी धरणात ९७ टक्के जलसाठा असून तेही लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. याशिवाय मोर धरणात ६१ टक्के, वाघूर धरणात ६०.५६ टक्के आणि हतनूर धरणात ५२ टक्के जलसाठा नोंदविण्यात आला आहे. शेळगाव बॅरेजमध्ये ४५.६१ टक्के, गूळ धरणात ४१.५१ टक्के, अंजनी धरणात ३०.५७ टक्के, गिरणा धरणात २७.१६ टक्के आणि बहुळा धरणात २४.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
तर मन्याड धरणात १६.८४ टक्के, भोकरबारीमध्ये १०.४१ टक्के, हिवरा धरणात ६.७२ टक्के आणि तोंडापूर धरणात केवळ १.४४ टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे, पारोळा तालुक्यातील बोरी आणि अग्नावती धरणांमध्ये अद्यापही जलसाठा शून्य असल्याने चिंता कायम आहे. या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस नाही. काही जलसाठ्यातील वाढीमुळे खरीप हंगामाला मोठा आधार मिळाला असून, पेरण्यांनाही वेग आला आहे.








