जळगाव लाईव्ह न्यूज । शासकीय कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागातील दोन अधिकाऱ्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. यथार्थ पांडुरंग निनावे (उपविभागीय अभियंता) व कुलदीप विरूचंद गमे (अभियांत्रिकी सहायक (वर्ग-३) ) असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने दहिवद येथील ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि गावहाळाचे काम पूर्ण केले होते. कामाचे मोजमाप व मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजुरीसाठी संबंधित कार्यालयात पाठवण्यात आले होते.

मात्र, हे बिल मंजूर करण्यासाठी उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांनी बिलाच्या रकमेच्या एक टक्के दराने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम ७ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. निनावे यांच्या सूचनेनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदीप गमे याने तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही रंगेहात पकडले.या दोन्ही अधिकाऱ्यांचा पगार अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख रुपये असतानाही त्यांनी लाच घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या कारवाईमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. पुढील तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.








