जळगाव लाईव्ह न्यूज । सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत स्टंटबाजी, तसेच महिलांचा अवमान करणारे रील्स तयार करून प्रसारित करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सायबर पॅट्रोलिंगच्या माध्यमातून अशा रील्सची तपासणी करून संबंधितांची ओळख पटविण्यात आली असून त्यांना पोलिस मुख्यालयात बोलावून समज देण्यात आली.

सध्या सोशल मीडियावर अशा रील्सचा पूर आला आहे, ज्याचा समाजावर, विशेषतः तरुण पिढीवर अत्यंत नकारात्मक परिणाम होत आहे. गुन्हेगारीचे समर्थन करणारे व्हिडिओ पाहून इतर तरुणही त्याचे अनुकरण करू लागले आहेत. तर दुसरीकडे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बनवलेले रील्स स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करत आहेत.

महिलांविषयी चुकीचा दृष्टिकोन आणि अवमान करणारा आशय समाजातील संवेदनशीलता आणि परस्पर सन्मानाला धक्का पोहोचवत आहे. या सगळ्या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, नवीन पिढीच्या भविष्याबद्दल समाजात नैराश्याचे वातावरण तयार होत होते.
या वाढत्या प्रकारांची गंभीर दखल घेत जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. पोलिसांनी सोशल मीडियावरील अशा आक्षेपार्ह रील्सची बारकाईने तपासणी केली. केवळ व्हिडिओ पाहून न थांबता पोलिसांनी या रील्समधील संबंधित तरुणांची अचूक ओळख पटवली. त्यानंतर या सर्वांना पोलीस मुख्यालयात पाचारण करण्यात आले.
पोलिसांच्या या कारवाईचा उद्देश केवळ दंडात्मक किंवा भीती घालणे एवढाच नव्हता; तर समाजात कायद्याबद्दल आदर निर्माण करणे, तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करणे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश देणे हा होता.












