जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहरातील के.जी.एन. कॉलनी परिसरात कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्घृणपणे बांधून ठेवलेली तीन जनावरे चोपडा शहर पोलिसांनी धाड टाकून जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची जनावरे जप्त करण्यात आली आहेत.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील बंद कत्तलखान्यासमोरील के.जी.एन. कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा प्रकार उघडकीस आला. संशयित आरोपी इद्रिस इस्माईल शेख (रा. के.जी.एन. कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, चोपडा) याने एक गाय, वासरु, बैलला कोणत्याही प्रकारची चारा किंवा पाण्याची व्यवस्था न करता, केवळ कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवले होते.

याप्रकरणी तक्रारदार यांनी ७ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १ लाख २० हजार रुपये किमतीची ३ जनावरे (एक गाय, वासरु, बैल) ताब्यात घेतली. तसेच आरोपी इद्रिस इस्माईल शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात प्राणीप्रेमींमधून संताप व्यक्त होत असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दीपक विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस करत आहेत.










