जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचं दिसत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या आठ दिवसांत दोन खुनाच्या घटना ताज्या असतानाच, आता सोमवारी (६ जुलै) रात्री भुसावळ शहर गोळीबाराच्या थराराने हादरले. दगडी पुला परिसरातील हनुमान मंदिराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गोलू रायसिंग पंडित हे त्यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तातडीने पलायन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, गोळीबाराचे नेमके कारण काय होते, किती गोळ्या झाडण्यात आल्या, या घटनेत गोलू पंडित जखमी झाले आहेत का, तसेच हल्लेखोरांची ओळख काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच गोळीबारामागील कारण स्पष्ट होणार आहे.










