जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२६ । मागच्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आता जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा जोर पडकला आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज शनिवारी पहाटपासून पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांना आता मोठी गती मिळणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावतीमार्गे मध्य प्रदेशातील बैतूल, बुरहानपूर आणि छिंदवाडा भागाकडे सरकणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, ८ जुलैनंतर पावसात मोठा खंड पडू शकतो, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

कोणत्या तालुक्यात कधी बरसणार?
४ आणि ५ जुलै रोजी जळगाव, धरणगाव, रावेर, चोपडा, यावल आणि भुसावळ या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
६ आणि ७ जुलै रोजी चाळीसगाव, पाचोरा, पारोळा आणि अमळनेर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
८ जुलै रोजी सातपुडा पट्ट्यातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता
जिल्ह्यात आतापर्यंत १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ३ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ७१ टक्के इतकाच आहे. म्हणजेच जिल्ह्यात सुमारे २९ टक्के पावसाची तूट आहे. आगामी चार दिवसांत अपेक्षित पाऊस झाल्यास ही तूट मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.







