जळगाव लाईव्ह न्यूज । अकोला येथे लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घराची नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘इन कॅमेरा’ झाडाझडती घेतली. या कारवाईत काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि अन्य साहित्य हाती लागल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथे किरण चौधरी यांच्यावर एसीबीने कारवाई केल्यानंतर जळगाव शहरातील ‘साईप्रभा आर्केड अपार्टमेंट’मधील त्यांचे निवासस्थान प्रशासनाने सील केले होते. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, चौधरी यांच्या दोन नातेवाईकांनी शासकीय सील तोडून घरात प्रवेश केला आणि महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस येताच जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने धाव घेत दोन्ही नातेवाईकांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या गंभीर घटनेनंतर चौधरी यांचे घर पुन्हा सील करून त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गुरुवारी दुपारनंतर नाशिक आणि जळगाव एसीबीचे विशेष पथक साईप्रभा आर्केड येथे दाखल झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पथकाने सीलबंद घर उघडले. घरात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे ही कारवाई अत्यंत गोपनीय आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. संपूर्ण कारवाईचे ‘इन-कॅमेरा’ (व्हिडिओ शूटिंग) चित्रीकरण करण्यात आले.
एसीबीच्या पथकाने घरातील प्रत्येक खोली, कपाटे, लॉकर, बँक खात्यांची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची बारकाईने तपासणी केली. गुरुवारी दुपारपासून सुरू झालेली ही शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तपासाच्या गोपनीयतेमुळे एसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने यावर अधिकृत भाष्य करणे टाळले.
अधिकृतपणे अद्याप कोणती माहिती जाहीर करण्यात आली नसली, तरी या झाडाझडतीत एसीबीच्या हाती काही अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज, बेनामी मालमत्तेचे कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित साहित्य लागल्याची जोरदार चर्चा आहे.नातेवाईकांनी नेमके कोणते पुरावे गायब करण्याचा प्रयत्न केला आणि घरातून नेमके काय जप्त झाले, याचा तपास आता एसीबी करत आहे. जप्त केलेल्या साहित्यामुळे किरण चौधरी यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होणार असून, या लाचखोरीच्या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.










