पेरणीनंतर पाऊस नाही, हताश होऊन बोदवडच्या शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल

जुलै 2, 2026 1:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । हवामानाचा लहरीपणा, कर्जाचा डोंगर आणि ऐन खरीप हंगामात पावसाने पाठ फिरवल्यामुळे बोदवड शहरातील एका ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गणेश एकनाथ राऊत (वय ४१, रा. प्रभाग क्र. १४, मोठा मारोती मंदिर परिसर, बोदवड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण बोदवड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ganesh rautbodwad

मृत गणेश राऊत यांच्याकडे साळशिंगी शिवारात सुमारे चार एकर शेती आहे. मागील वर्षी झालेल्या नापिकीमुळे ते आधीच आर्थिक संकटात सापडले होते. यावर्षीचा खरीप हंगाम हाती घेण्यासाठी त्यांनी बँकेकडून (विकासो) सुमारे ४२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले होते, तसेच त्यांच्यावर खासगी कर्जाचाही भार होता. यंदा मृग नक्षत्रात त्यांनी मोठ्या आशेने शेतीची मशागत करून मका आणि तुरीची पेरणी केली होती. मात्र, पेरणी होऊन १५ ते २० दिवस उलटले तरी पाऊस न पडल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. याच विवंचनेतून आणि हताशपणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी सायंकाळी गणेश राऊत यांनी जिरा सोड्याच्या बाटलीत विषारी द्रव्य मिसळून त्याचे प्राशन केले. घराजवळ त्यांना उलटी होत असल्याचे त्यांचे वडील एकनाथ राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने दुसरा मुलगा विलास राऊत याला बोलावून घेतले. विलासने गणेश यांना तातडीने बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, जळगावला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी मृत शेतकऱ्याचे बंधू विलास राऊत यांच्या खबरीवरून बोदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत गणेश राऊत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध वडील असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now