Jalgaon : चार वर्षांच्या भाचीवर अत्याचार करणाऱ्या चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी

जुलै 2, 2026 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मन्यारखेडा (ता. भुसावळ) येथे चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी असलेल्या तिच्या सख्ख्या चुलत मामाला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. परमानंद कन्हैयालाल गोरे (वय २६, रा. दुलई, ता. खालवा, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे सजा झालेल्या नराधम आरोपीचे नाव असून यासोबतच न्यायालयाने त्याला २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहेत.

court crime jpg webp

या प्रकरणातील पीडित मुलगी व तिचे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील असून रोजगारासाठी ते भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा शिवारात वास्तव्यास होते. १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी पीडित मुलगी आरोपीच्या घरी खेळण्यासाठी गेली असता, आरोपीने खेळण्याचा बहाणा करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

घरी परतल्यानंतर मुलीने रडत आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री वडील घरी आल्यानंतर त्यांनाही सर्व माहिती देण्यात आली. आरोपीला जाब विचारल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी फरार झाला. आजोबांची प्रकृती बिघडणे आणि सामाजिक दबावामुळे फिर्याद दाखल करण्यास काहीसा विलंब झाला. त्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, पंच साक्षीदार तसेच तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी न्यायालयाने महत्त्वपूर्ण मानल्या.

जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवत कलम ६ नुसार २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड सुनावला. दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

या प्रकरणात पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील तसेच केस वॉच अधिकारी पोलीस निरीक्षक गुणवंत सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now