इंदूर-अमळनेर बसमधून गुटख्याची तस्करी; अमळनेरचा तस्कर गजाआड

जून 30, 2026 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । FDA विभागात तुकाराम मुंढे यांची एंट्री झाल्यापासून राज्यातील गुटखा तस्कर आणि माफियांविरोधात धडक कारवायांचा धडाका सुरू झाला आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही छुप्या मार्गाने होणारी गुटख्याची आंतरराज्यीय तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी त्यांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. अशातच एसटी बसमधून गुटख्याची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या अमळनेरच्या तस्कराला शिरपूर पोलिसांनी जेरबंद केलं. त्याच्याकडून हजारो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.

gutka

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराज्यीय धावणारी ‘इंदूर ते अमळनेर’ (एमएच १८ व्ही ९०४८) ही एसटी बस शिरपूर बसस्थानकात आली. यावेळी पोलिसांनी बसमध्ये अचानक तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान बसमधील एका संशयित तरुणाच्या मोठ्या पिशव्यांची झडती घेण्यात आली असता, त्यात महाराष्ट्रात पूर्णपणे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव निखिल रमेश शिंगाणे (वय २५, रा. अमळनेर) असल्याचे सांगितले. पोलिसांनुसार, त्याच्याकडून ३४ हजार ८४८ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी शशिकांत राणे यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निखिल शिंगाणे याच्यासह गुटखा पुरवठादार, उत्पादक, मुख्य मालक आणि संचालक अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now