धक्कादायक : पावतीचे पैसे देण्यावरून कटलरी विक्रेत्यास दगडाने मारहाण
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । कटलरी विक्रेत्यासह त्यांच्या मुलाला पावतीचे पैसे देण्यावरून मनपाच्या वसुली ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून दगडाने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर घडली. पंढरी हिरागीर गोसावी (वय- ५८,) असे यात जखमी झालेल्यांचे नाव असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान, पंढरी गोसावी यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने पैसे वसुल करत असल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत असे की, पंढरी गोसावी हे कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील कस्तुरी हॉटेल समोर हातगाडीवर कटलरी दुकान लावून विक्री करतो. त्यांच्या या कामात त्यांचा मुलगा ईश्वर हिरागीर गोसावी हा मदत करतो. नेहमीप्रमाणे पंढरी आणि ईश्वर यांनी मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हातगाडीचे दुकान लावले.
या दरम्यान महानगरपालिका वसुली काम करणारे ठेकेदार कर्मचारी संतोष कोळी (पुर्ण नाव माहित नाही) आणि पवन परदेशी हे दुकानावर आले. महापालिकेची २० रूपयांची पावती देवून पैसे मागितले. यांनतर पंढरी गोसावी यांनी ‘तुम्ही फिरून या, मी तुम्हाला पैसे देतो,’ असे सांगितले. यावर वसुली कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने पैसे काढून घेत मारहाण करण्यास सुरूवात केली.
पंढरी यांना दोघेजण दगडाने मारत असल्याचे पाहून मुलगा ईश्वर गोसावी हा भांडणात आल्याने त्याला देखील मारहाण करण्यात आली. यानंतर जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पंढरी गोसावी यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने पैसे वसुल करत असल्याची तक्रार दाखल केली आहे.