एकनाथ शिंदेंचा नाशिकमध्ये मास्टरस्ट्रोक; जळगावच्या ‘या’ दोन्ही नेत्यांकडे मोठी जबाबदारी

जून 22, 2026 4:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२६ । स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आज सोमवारी सकाळी स्पष्ट झाले असून, महायुतीने जळगावसह बहुतांश जागांवर घवघवीत यश मिळविले आहे. मात्र, नाशिकमध्ये महायुती तथा शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला असून बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले आहेत. या निकालानंतर गोकुळ गीते हे आता शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर आलीय.

ShindeNK

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ गीते यांच्याशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून त्यांच्या पक्षप्रवेशासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील आणि जळगावचे खासदार उन्मेष पाटील या जळगावच्या दिग्गज नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती.

आज दुपारी हे दोन्ही नेते नाशिकमधील गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांच्यात काही वेळ महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर, या दोन्ही नेत्यांनी गोकुळ गीते यांना सोबत घेतले आणि ते नाशिक विमानतळाकडे रवाना झाले आहेत.

नाशिक विमानतळावरून विशेष विमानाने हे नेते गोकुळ गीते यांना घेऊन थेट मुंबईसाठी रवाना झाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोकुळ गीते यांचा जाहीर शिवसेना प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नाशिकची जागा शिवसेनेकडे असताना तिथे बंडखोरी झाली आणि अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे महायुतीमध्ये विशेषतः शिवसेनेच्या गोटात प्रचंड नाराजी होती. मात्र, निवडणूक जिंकलेल्या गोकुळ गीते यांनाच थेट पक्षात ओढून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आणि महायुतीतील अंतर्गत छुप्या विरोधकांनाही मोठा शह दिला आहे. या प्रवेशामुळे तांत्रिकदृष्ट्या नाशिकची जागा पुन्हा एकदा शिवसेनेकडेच (शिंदे गट) राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now