जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आज शहरातील १००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले. आमदार राजूमामा यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत हा स्तुत्य उपक्रम राबवला.

बॅनरबाजीला फाटा, ‘वह्यादान’ करण्याचा संकल्प
दिनांक १३ जून रोजी आमदार सुरेश भोळे यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची जाहिरात, होर्डिंग किंवा बॅनरबाजी न करता, समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ‘वह्यादान’ करण्याचे आवाहन आमदार राजूमामा यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तब्बल १००० वह्यांचे संकलन केले होते.

या संकलित केलेल्या वह्या व दप्तरांचे वाटप आज २१ जून (रविवार) रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार स्मिता वाघ, महापौर दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील १,००० विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद गोविंद चौधरी व उदय भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपचे सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी तसेच भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.












