जळगावात पोलिसांचे पहाटेच्या अंधारात कोंबिंग ऑपरेशन; ३ तासांत १२५ अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

जून 16, 2026 11:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२६ । जळगाव शहरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी आज १६ जून रोजी भल्या पहाटे शहरात व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवत तब्बल १२५ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. आज पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान झालेल्या या धडक कारवाईमुळे जळगावच्या गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

CO jlpolice

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने हा ॲक्शन प्लॅन आखला होता. पहाटेच्या अंधारात शहर पोलीस ठाणे, शनिपेठ, एमआयडीसी, रामानंद नगर, जळगाव तालुका आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व संवेदनशील भागांना पोलिसांनी वेढा घातला आणि अचानक छापेमारी सुरू केली.

अवघ्या ३ तासांत राबवलेल्या या मोहिमेत पोलिसांनी प्रामुख्याने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्ह्यांतील वॉन्टेड आरोपी आणि शहरातून हद्दपार (तडीपार) केलेले असतानाही बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या गुंडांवर धडक कारवाई केली. या सर्व ६ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून एकूण १२५ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या धडाक्यामुळे जळगावकरांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांचे कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now