‘ऑपरेशन ब्लू स्टार’वरील वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांना भोवणार? भाजप केंद्रीय नेतृत्व नाराज!

जून 10, 2026 2:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पंजाबमधील अमृतसर येथे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा राजकीय गोंधळ उडाला असून, खुद्द भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय नेतृत्वाने यावरून तीव्र नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

Operation Blue Star girish mahajan

नेमकं काय म्हणाले मंत्री महाजन?

कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी १९८४ मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा उल्लेख ‘इतिहासातील काळा दिवस’ असा केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला, असे त्यांनी म्हटले. याचबरोबर त्यांनी या लष्करी कारवाईची तुलना अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणाशी करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात झालेल्या शीखविरोधी दंगलींचाही त्यांनी उल्लेख केला.

अमृतसर येथील ज्या कार्यक्रमाला गिरीश महाजन उपस्थित होते, तिथे विभाजनवादी नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे उदात्तीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. अशा वादग्रस्त कार्यक्रमाला भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने लावलेली हजेरी आणि तिथे केलेले वक्तव्य यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. या कारवाईत मृत्युमुखी पडलेल्यांचा महाजन यांनी ‘शहीद’ असा उल्लेख केल्याने वादात आणखीच भर पडली.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाजन यांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा आहे. “गिरीश महाजन यांनी ‘ऑपरेशन् ब्लू स्टार’बाबत केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते, ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही,” असे स्पष्ट करत भाजपने या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले आहे. महाजन यांच्या विधानामुळे पक्षाची कोंडी झाली असून, आगामी काळात त्यांच्यावर पक्ष पातळीवरून काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now