यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

जून 9, 2026 5:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे यावल तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देत यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.

Yaval taluka cataract free

या मोहिमेअंतर्गत १० जूनपासून यावल तालुक्यातील २४ टप्प्यांमध्ये विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरांमध्ये नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांचीही तपासणी केली जाणार असून आवश्यकतेनुसार आरोग्य मार्गदर्शन व उपचार दिले जाणार आहेत.तपासणीत मोतीबिंदू अथवा इतर नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अभियान विशेष लाभदायी ठरणार आहे.

या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर व डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत आहे. मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाचे समन्वयन डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे हे तपासणी करणार आहेत.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचविणे ही संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. तपासणीपासून शस्त्रक्रिया व पुढील उपचारांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आतापर्यंत विविध गावातील हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शेकडो यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी लाभली आहे. १० जूनपासून यावल तालुक्यात गावोगावी आयोजित शिबिरांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now