विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान
जळगाव लाईव्ह न्यूज । आपले परिवार सार्वजनिक वाचनालय, भुसावळ तर्फे साने गुरुजी स्मृती सप्ताह व कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव यशोत्सव – उत्सव गुणवत्तेचा’ व पुरस्कार प्रदान समारंभ आज डॉ. बी. व्ही. खाचणे सभागृह, नंदनवन कॉलनी, भुसावळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशन जळगावच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे, लोढा ग्रुप (पुणे रिजन) चे डेप्युटी सी.ई.ओ. तुषार येवले, डॉ. पंकज पाटील, भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे, नाहाटा कॉलेजचे चेअरमन महेशभाऊ फालक, के. नारखेडे हायस्कूलचे चेअरमन पी. व्ही. पाटील, भालोद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश नेहते, भोरगाव लेवा पंचायत कुटुंबनायक ललित पाटील तसेच सुहास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी माता शारदा, श्री गजानन महाराज, साने गुरुजी व कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रवेशद्वारावर सर्व मान्यवरांचे औक्षण करून वाचनालयाच्या संचालकांनी त्यांचे स्वागत केले. कु. नुपूर भालेराव यांच्या सुरेल गणेशवंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांताराम पाटील गुरुजी यांनी केले. त्यांनी वाचनालयाची यशस्वी वाटचाल, गुणगौरव उपक्रम तसेच समाजासाठी करण्यात आलेल्या विविध कार्यांचा आढावा घेतला. वाचनालयाच्या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली.
दि. ५ जून ते ११ जून या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या साने गुरुजी स्मृती सप्ताह तसेच कर्मयोगी वासुदेव गुरुजी (माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे वडील) यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पॅड देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने कु. गुंजन अत्तरदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कर्मयोगी वासुदेव गुरुजी संघटक गौरव पुरस्कार २०२६ खालील संस्थांना प्रदान करण्यात आला :
- माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ, तळवेल ता. भुसावळ – संस्थापकीय कार्यकारी मंडळ ते विद्यमान कार्यकारी मंडळ नेतृत्व शृंखला
- स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ, खडका ता. भुसावळ – संस्थापकीय कार्यकारी मंडळ ते विद्यमान कार्यकारी मंडळ नेतृत्व शृंखला
- सकल लेवा महिला मंडळ, भुसावळ – संस्थापकीय कार्यकारी मंडळ
- लेवा प्रतिष्ठान, वाणी कॉलनी, जुना वांजोळा रोड, भुसावळ – संस्थापकीय ते विद्यमान कार्यकारी मंडळ नेतृत्व शृंखला
कर्मयोगी वासुदेव गुरुजी प्राध्यापक गौरव पुरस्कार २०२६ प्रा. डॉ. सुनील मधुकर नेवे, विभागप्रमुख (राज्यशास्त्र), कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद तथा अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान भुसावळ यांना प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी वासुदेव गुरुजी उपप्राचार्य गौरव पुरस्कार २०२६ प्रा. शैलेश रमेश राणे, उपप्राचार्य, सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रावेर; अध्यक्ष, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी तसेच चेअरमन, शिक्षण विकास मंडळ, विवरे ता. रावेर यांना प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी वासुदेव गुरुजी मुख्याध्यापक गौरव पुरस्कार २०२६ मा. जयंत रमेश चौधरी, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय वड्री ता. यावल तसेच डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर, मुख्याध्यापक, नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी ता. मुक्ताईनगर व संस्थापक अध्यक्ष, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन यांना प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी वासुदेव गुरुजी शिक्षक गौरव पुरस्कार २०२६ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला :
- डॉ. विजय काशिनाथ बागुल – पदवीधर शिक्षक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा वराड बुद्रुक, ता. जळगाव
- ललित अनंत बढे – क्रीडा शिक्षक, सत्कार विद्यामंदिर अट्रावल, ता. यावल
- राजेंद्र गुलाबराव साळी – उपक्रमशील कला शिक्षक, एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव, ता. मुक्ताईनगर
- ज्ञानदेव रघुनाथ धांडे – क्रीडा शिक्षक, ज्ञानज्योती विद्यालय, खडके, ता. भुसावळ
- योगिता ज्ञानदेव झांबरे – विज्ञान शिक्षिका, मंजाबाई महादू नारखेडे विद्यालय, रुईखेडे, ता. मुक्ताईनगर
- हेमांगी अशोक पाटील – उपशिक्षिका, नगरपालिका शाळा क्र. ३५, भुसावळ
- संजीवनी संजय यावलकर – संचालिका, लिटल फ्लॉवर्स फन स्कूल, भुसावळ
- शुभांगी सुनील सरोदे – कवयित्री, पिंपळगाव बुद्रुक ता. भुसावळ, सध्या मुक्काम वापी
जीवन गौरव पुरस्कार २०२६ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण घनश्याम पाटील यांना प्रदान करण्यात आला. ते झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळ भुसावळचे संस्थापक अध्यक्ष, परशुराम मंदिर ट्रस्ट तापीतीर अकलूदचे संस्थापक अध्यक्ष, श्री शारदा शिक्षण मंडळ दीपनगरचे संस्थापक संचालक तसेच विविध संस्थांचे मार्गदर्शक आहेत.
युवा गौरव पुरस्कार २०२६ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला :
- तुषार सुधाकर येवले – डेप्युटी सी.ई.ओ., लोढा ग्रुप (पुणे रिजन), को-चेअरमन इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल पुणे
- वैभव किशोर ढाके – संचालक, राधाकृष्ण लॉन्स, भुसावळ
- विनायक शंकर पाचपांडे – देहदान संकल्प सुवर्ण महोत्सवी वर्षात भुसावळ ते शेगाव पायी वारी अभियान
- डॉ. लोकेश सुरेश नेहते – विघ्नहर्ता न्यूरो अँड स्पाईन हॉस्पिटल, भुसावळ
- सतीश घनश्याम महाजन – रक्तदूत जीवदान ब्लड ग्रुप, ग्रामीण भुसावळ
पुरस्कारार्थींना आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाल, कै. गोदावरी पाटील यांच्या आत्मचरित्रात्मक ‘हितगुज’ पुस्तकाची प्रत व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या मनोगतातून डेप्युटी सी.ई.ओ. तुषार येवले यांनी जीवनात चांगला मित्र निवडणे व मिळणे हे भाग्याचे लक्षण असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत सी.ई.ओ. पदापर्यंतचा प्रवास मित्र डॉ. पंकज पाटील व आमदार अमोल जावळे यांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पुरस्कारांच्या माध्यमातून कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या कार्याची प्रेरणा समाजात रुजविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमामुळे समाज एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होते. “चांगलं पाहिलं, चांगलं बोललं, चांगलं ऐकलं की चांगलंच होते” हा गोदावरी आईंचा विचार जीवनाला दिशा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. आई-वडिलांच्या स्मृती जागविताना ते भावूक झाले.
पुरस्कारार्थींच्या वतीने कला शिक्षक राजेंद्र साळी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतातून आमदार एकनाथराव खडसे यांनी कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या अफाट शैक्षणिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यामुळे विवरे गावाने देशाला अनेक रत्न दिली असून त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी सेवा केली त्या-त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळला, असे ते म्हणाले. तसेच आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा व मदतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीलाच उपस्थितांची नोंद घेऊन प्रत्येकाला वाचनालयाचा लोगो असलेला बॅच देण्यात आला. सभागृहातून बाहेर पडताना प्रत्येकाला ‘हितगुज’ हे पुस्तक व ‘गोदावरी’ साप्ताहिकाचा अंक भेट देण्यात येत होता. परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. विविध भित्तीपत्रकांवरील माहिती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. प्रत्येक कृतीमागे आयोजकांचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन जाणवत होता.
एकंदरीत मान्यवर व पुरस्कारार्थींच्या चेहऱ्यावरील हास्य, आनंद आणि कार्यसंतोष या कार्यक्रमाच्या यशाची साक्ष देत होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वर्षा लोखंडे, नगरसेविका अशा पाटील व येवले यांनी केले. आभार प्रदर्शन शैलेंद्र महाजन, उपशिक्षक के. नारखेडे हायस्कूल, भुसावळ तथा संचालक, भुसावळ माध्यमिक पतपेढी यांनी केले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद सरोदे, अजय वाघोदे,सतीश ढाके,उदय बोंडे ,अनिल फेगडे,पंकज अत्तरदे,अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.









