जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था कडक करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेत गावठी कट्टे, तीक्ष्ण चाकू आणि कोयते असा अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ५ अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी ही कोंबिंग ऑपरेशन आणि तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथके व वाहतूक शाखेच्या अधिकारी/अंमलदार यांनी सहभाग घेतला. विविध ठिकाणी नाकाबंदी करून संशयित व्यक्ती, वाहने व गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली. तसेच फरार आरोपी, पाहिजे आरोपी, प्रतिबंधक कारवाईस पात्र व्यक्ती, रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.

मोहिमेदरम्यान संशयित वाहनांची तपासणी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, फरार आरोपीचा शोध, तसेच जिल्ह्यातील संवेदनशील व गुन्हेप्रवण भागांमध्ये पायी व वाहनाद्वारे गस्त घालण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलीस पथकाने विविध संशयितांची झाडाझडती घेतली. यादरम्यान काही सराईत गुन्हेगारांकडे प्राणघातक शस्त्रे मिळून आली. पोलिसांनी तत्परता दाखवत शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३/२५ आणि ४/२५ अन्वये ४ गुन्हे दाखल केले असून, यामध्ये एकूण ५ जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी गट्टे, एक कोयता, दोन चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.








