Chalisagaon : अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना ठार मारण्याचा कट, पोलिसांनी चौघांच्या आवळल्या मुसक्या

मार्च 5, 2026 4:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील दस्केबर्डी गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मेहुणबारे पोलिसांनी या प्रकरणातील चौघांच्या मुसक्या आवळल्या असून गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

mehunbare

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ईश्वर उर्फ भैया लक्ष्म अहिरे आणि दस्केबर्डीचे सरपंच भगवान उत्तम देवरे हे दोघे बुलेट मोटारसायकलवरून चाळीसगाव येथून दस्केबर्डीकडे जात होते. मेहुणबारे ते शिंदवाडी रस्त्यावर समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही खाली पडले असून सरपंच देवरे गंभीर जखमी झाले. सुरुवातीला हा साधा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र घटनेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पिकअप वाहन मालकास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, दस्केबर्डी गावातील राजकीय मतभेदातून हा कट रचल्याचे समोर आले. संशयित आरोपींनी संगनमत करून सरपंच आणि उपसरपंचांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच पिकअप ने धडक दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी भीमराव पांडुरंग रोकडे, सचिन भीमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी, लक्ष्मण अशोक महाजन (वाडे, ता. भडगाव – पिकअप मालक) या संशयित आरोपींना अटक केली आहे.

मेहुणबारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त केले असून संशयितांविरुद्ध अपघाताचे कलम वगळून खूनाचा प्रयत्न आणि कट रचल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, उपनिरीक्षक विकास शिरोळे तसेच पोलीस कर्मचारी किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, योगेश पाटील, विनोद बेलदार आणि संजय लाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड आणि पोलीस कर्मचारी संजय लाटे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now