जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुसावळ–दादर मार्गावरील विशेष गाड्यांच्या कालावधी पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ–दादर (०९०५०) यांचा कालावधी २७ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) यांचा कालावधी २८ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे.

विशेष गाड्यांचा कालावधी वाढविल्यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांना उपलब्ध आसनाची आणि प्रवासाची सोयी अधिक होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेवर तिकीट आरक्षण करण्याची सूचना केली आहे, जेणेकरून प्रवास सुरळीत आणि सुरक्षित राहील.







