जळगाव लाईव्ह न्यूज । दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि भुसावळ शहर पोलिसांनी राबविलेल्या संयुक्त कारवाईत एका आंतरराज्य सराईत चोरट्याला अटक केली. मुक्ताईनगर येथील किरण ऊर्फ करण शालिग्राम पाटील याच्याकडून सुरत (गुजरात) आणि भुसावळ येथून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, मोठे चोरी रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी भुसावळ शहरातील अॅड. रोकडे यांची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केला.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मुक्ताईनगर येथील किरण पाटील याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अॅड. रोकडे यांची मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.
चौकशीत संशयिताने गुजरात राज्यातील सुरत येथील अलथान पोलिस ठाणे हद्दीतून (जीजे ०५ एनए ६१८०) क्रमांकाची दुचाकी चोरल्याचेही मान्य केले. ही दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितावर यापूर्वी मलकापूर आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातही दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे, राहुल भोई, तालुका पोलिस ठाण्याचे नितीन चौधरी यांनी केली.










