जळगाव लाईव्ह न्यूज । गोलाणी संकुलातील मोबाइल व्यावसायिक कृष्णकुमार डुगराराम चौधरी (३२) व त्यांचा भाचा गणपतलाल घेवाराम माली (१९) या दोघांचं अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई केली आहे. शनिपेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाइल लोकेशनच्या आधारे काही तासांतच अकोल्यातून तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. यात एका अल्पवयीनाचा देखील समावेश आहे.

काय आहे नेमका प्रकार?
कृष्णकुमार चौधरी यांचे गोलाणी मार्केटमध्ये मोबाइल साहित्य विक्रीचे दुकान आहे. कृष्णकुमार व त्यांचा भाचा गणपतलाल माली हे दोघे रविवारी सायंकाळी घरी जात होते. त्याचवेळी गोलाणीतील मोबाइल दुकानातील कामगार यश जितेंद्र माकोडे याने त्यांना कॉल केला व तुमचे राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. पार्सल घेण्यासाठी सुरुवातीला गणपतलाल याला ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेऊन तेथे बांधून ठेवले. त्यानंतर ओटीपी व सहीशिवाय पार्सल मिळत नाही असा बहाणा करत दुचाकीवर कृष्णकुमार यांना घेतले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांनाही त्याच इमारतीत बसवून ठेवले.

याबाबत कृष्णकुमार यांनी विचारले असता, मला मारण्याची सुपारी दिल्याने तुला येथे आणल्याचे यश म्हणाला. मात्र आपण खरेखोटे करण्यास तयार असल्याचे कृष्णकुमार यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून यश गोलाणी मार्केटकडे आला व तेथून चहाविक्री करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मागे बसवून भुसावळकडे निघाला. काही अंतर पार केले. आणि सोबतच्या अल्पवयीन मुलाला गणपतलालला घेऊन ये असे सांगत परत पाठवले. त्यानंतर मामा आणि भाचे अशा दोघांनाही अकोला येथे नेले. तेथे भाच्याला सोडवायचे असल्यास २० लाख रुपये घेऊन ये असे कृष्णकुमार यांना सांगितले.
जळगावात येताच त्यांनी मध्यरात्री पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. यश, गोलाणी मार्केटमधील चहा विक्रेता व एक अल्पवयीन अशा तिघा संशयितांनी या अपहरण नाट्याला आकार दिला. त्यांनी कृष्णकुमारांशी संपर्क केल्यानंतर मोबाइल सुरूच ठेवला. त्यामुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन सहज मिळाले आणि लोकेशन ट्रॅक करून काही तासांतच अकोला गाठून तिघांना पकडले असून पुढील तपास सुरू आहे.











