जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२६ । जळगाव महापालिकेच्या विशेष सभेत महापौर दीपमाला काळे यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली. सोबतच महिला व बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांची निवड करण्यात आली

जळगाव महानगरपालिकेत महायुतीने एकहाती वर्चस्व स्थापन केल्यानंतर महापौर पदी दीपमाला काळे तर उपमहापौर पदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची निवड झाली होती. यानंतर आता महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती व महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांची आज सोमवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी निवड करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्यात आली होती.

महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक शुक्ला उपस्थित झालेल्या या विशेष सभेत भाजप, शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आलेल्या बंद लिफाफ्यांमधील नावांची उघड करून महापौरांनी एकूण १६ स्थायी समिती सदस्यांची घोषणा केली. यापैकी भाजपचे १०, शिवसेना शिंदे गट ५, तर शिवसेना ठाकरे गटाचा १ सदस्य स्थायी समितीत स्थान मिळवला आहे.
तसेच महिला व बालकल्याण समितीवर देखील भारतीय जनता पक्षाचे ५, शिवसेनेचे ३ आणि शिवसेना ठाकरे गटाचे १ सदस्य यांची निवड झाली. या सर्व सदस्यांचेही अभिनंदन करण्यात आले. सदर दोन्ही सभापतींची निवड आता विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात होणार आहे. त्यासाठी पुढील काही दिवसात पक्ष नेतृत्वाकडून हालचाली होतील.
निवड झालेल्या स्थायी समिती सदस्य
भाजप : दीपक सूर्यवंशी, नितीन लढ्ढा, विशाल भोळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके.
शिवसेना शिंदे गट : विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे , सागर सोनवणे
शिवसेना उबाठा : इब्राहिम पटेल
निवड झालेले महिला व बालकल्याण समिती सदस्य
भाजपा : सुरेखा नितीन तायडे, रंजना विजय वानखेडे, पूजा विजय जगताप, विद्या मुकुंदा सोनवणे, गायत्री राणे
शिवसेना : सिंधुताई कोल्हे, प्रतिभाताई देशमुख, डॉ.अमृता सोनवणे
शिवसेना ठाकरे गट : हिंनाबी शाकीर खान











