जळगावमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे तीन घरे जळून खाक

फेब्रुवारी 15, 2026 6:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरातील जुने जळगाव येथील तरुण कुडापा चौकात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन घरे आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना आज रविवारी सकाळी साधारण १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत संबंधित कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे.

frjunejl

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुढापा चौकातील निलेश शंकर शिरसाट आणि बापू शंकर शिरसाट यांच्या घरातून आगीची सुरुवात झाली. विद्युत शॉर्टसर्किटमुळे प्रथम ठिणगी पडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आणि आगीने विक्राळ रूप धारण केले. लाकडी पार्टिशनची घरे असल्याने ज्वाळा झपाट्याने पसरल्या आणि शेजारील घरांनाही आगीने कवेत घेतले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत संसारोपयोगी वस्तू, कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली आहेत. राहते घर काही क्षणांतच राखरांगोळी झाल्याचे पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. धूर आणि ज्वाळांचे प्रचंड लोट पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. काही जणांनी घरातील सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे स्वरूप इतके भीषण होते की स्थानिकांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या.घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकाच्या अग्निशमन विभागाचे पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अरुंद रस्ते आणि परिसरातील गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. तरीही शर्थीचे प्रयत्न आणि समन्वय साधत त्यांनी काही तासांत आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now