जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घेतला असून घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत चोरीच्या तीन दुचाक्या जप्त केल्या. या प्रकरणी जामनेर व भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे अनुराग लक्ष्मण सुनगत (वय. १९, रा. वाकी रोड, हरिओम नगर, जामनेर) व दर्शन बापू चव्हाण (क्य. १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने विविध
ठिकाणांहून तीन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान संशयिताकडून जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन तसेच भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा तीन चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. जप्त केलेला मुद्देमाल व संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल आदींच्या पथकाने कारवाई केली.









