जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात बदलत्या हवामानामुळे थंडी ओसरली आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरणामुळे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. पुढील २४ तास असेच वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यामुळे सकाळी धुके, तर दुपारनंतर उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडीची तीव्रता कमी झाली असून, राज्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात आहे.

राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्या. रायगड जिल्ह्यात पहाटे चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे, ठाण्यातील घोडबंदर रोड आणि आसपासच्या परिसरात पावसाचा शिडकाव झाला. ठाणेकरांना ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवायला मिळत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली शहादा शहरात पाऊस झाला. तर जिल्ह्यात सर्वत्र हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे गणित पूर्णपणे बिघडले असून पपई आणि गहू पिकाला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.






