जळगाव । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी केली जात आहे. मात्र याच दरम्यान, निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान जळगाव मनपाचे आयुक्त ढेरे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांवर बोट ठेवत चक्क पत्रकारांना आणि छायाचित्रकारांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश नाकारला

मतमोजणीच्या वेळी नेहमीच निवडणूक आयोगाच्या अधिकृत पासधारक पत्रकारांना मीडिया कक्षात किंवा जाळीच्या बाहेरून वृत्तांकन करण्यास मुभा असते. मात्र, आज आयुक्तांनी मनमानी कारभार करत कुणालाही प्रवेश न देण्याचा हेका धरला. पत्रकारांनी आयुक्तांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी “आम्ही कोणालाही परवानगी देणार नाही,” असे सागितले आत काय चालले आहे, हे बाहेर येऊ नये यासाठी प्रशासनाचा हा खटाटोप कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘लोकशाहीच्या चौथ्या स्तंभा’लाच वेशीवर रोखण्याच्या या ‘मुजोर’ प्रकारामुळे पत्रकारांनी संताप व्यक्त करत ठिय्या मांडला. अखेर पत्रकारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. जळगाव प्रशासनाने आज नियमांचा चुकीचा अर्थ लावून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, याची चर्चा होत आहे.











