जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात चढ उतार दिसून येत असून रविवारी (दि ४) एकाच दिवसात ५ अंशाहून अधिकची वाढ झालेल्या किमान तापमानात काल सोमवारी ३ अंशांपर्यंतची घट नोंदविण्यात आली. ज्यामुळे जळगावकरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. ढगाळ वातावरण आणि ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले असून, आगामी काही दिवस असाच गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जळगावचे किमान तापमान १० अंशाखाली घसरले होते. सलग तीन दिवस किमान तापमान ९ अंशाच्या घरात होते. मागच्या दोन दिवसात अचानक वातावरणात बदल दिसून आला. ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ज्यामुळे शनिवारी ९.१ अंशांवर असलेल्या किमान तापमानाचा पारा रविवारी तब्बल ५.४ अंशांनी वाढून १५.५ अंशांवर पोहोचले होते. परिणामी रविवारी सकाळी थंडीची तीव्रता जाणवली नाही.

मात्र काल सोमवारी जळगावचे कमाल तापमान ३ अंशांनी घटल्याने जळगावकरांना भरदिवसाही हुडहुडी भरली आहे. सोमवारी जळगावचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत होते. किमान तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातही घसरण झाली आहे. रविवारी २९ अंश असलेला कमाल तापमानाचा पारा सोमवारी २६ अंशांपर्यंत घसरले होते. ढगाळ वातावरण आणि ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले असून, आगामी काही दिवस असाच गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुढील ४८ तास महत्त्वाचे, धुक्याची चादर पसरणार..
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत जिल्ह्याचा किमान पारा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने जरी तापमान १० अंशांच्या पुढे राहील तरी प्रत्यक्ष जाणवणारा गारठा अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेषतः सकाळी दाट धुक्याची चादर पसरणार असल्याचा अंदाज आहे. तसेच १५ ते २० किमी प्रतितास वेगाने वाहणारे उत्तरेकडील वारे थंडीची तीव्रता अधिक वाढवतील. दिवसाच्या कमाल तापमानात झालेली ही ३ अंशांची घट आणि थंड वारे यामुळे जळगावकरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे







