जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील साई किसान ठिबक या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या आगीत लाखो रुपयांचा माल जाळून खाक झाला आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम अग्निशमन दलांकडून सुरू होते.

औद्योगिक वसाहतीत के सेक्टरमध्ये जगन्नाथ जाधव यांच्या मालकीचा साई किसान नावाचा ठिबक सिंचन संच निर्मितीचा कारखाना आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे ठिबकच्या नळ्या तयार करण्याचे काम कारखान्यात सुरू असताना, रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी २० ते २५ कामगार आतमध्ये काम करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व जण तातडीने बाहेर पडले. त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र, आतमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. कारखान्याच्या गोदामात साठवून ठेवलेला ठिबक सिंचन नळ्यांचा मोठा साठा जळून भस्मसात झाला.

आगीची घटना लक्षात आल्यानंतर महावितरणकडून तातडीने परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही करण्यात आली. आगीची माहिती मिळाल्यावर जळगाव महापालिकेसह भुसावळ, वरणगाव आणि नशिराबाद नगर परिषदांचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
जवळपास सहा बंबांच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन आग लागण्याचे कारण तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.











