Jalgaon : नाशिकसाठी जळगावहून ई-शिवाई बससेवा.. ‘इतके’ आहे तिकीट दर? जाणून घ्या वेळापत्रक

नोव्हेंबर 29, 2025 3:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव बस स्थानकावरून नाशिकला बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगावहून नाशिकसाठी नुकतीच ई-शिवाई बससेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाशांना अधिक सुखसोयींसह पर्यावरणास अनुकूल आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. जळगाव ते नाशिक ई-शिवाई बसचे पूर्ण तिकीट ६९३ रूपयांपर्यंत आहे.

e bus

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात वातानुकूलीत इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिले आहेत. ज्यात जळगाव विभागात आतापर्यंत एकूण ४२ ई-शिवाई बस दाखल झाले असून त्यात नऊ मीटर लांबीच्या १७ आणि १२ मीटर लांबीच्या २५ बसेसचा समावेश आहे. पैकी नऊ मीटरच्या १२ बसेस जळगाव आगाराला तसेच पाच बसेस चोपडा आगाराला देण्यात आल्या आहेत. तर १२ मीटरच्या १५ बसेस जळगाव आगाराला आणि १० बसेस चोपडा आगाराला देण्यात आल्या आहेत.

नऊ मीटरच्या बसेस एकदा चार्ज केल्यानंतर साधारण २०० किलोमीटर तर १२ मीटरच्या बसेस साधारणपणे २८० किलोमीटरपर्यंत सहजपणे धावतात. त्यादृष्टीने जळगाव आणि चोपडा या दोन्ही आगारांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोला, बीड, नंदुरबार, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, अमळनेर आणि रावेर या मार्गावर ई-शिवाई बस सुरू केल्या आहेत.

दरम्यान, जळगावहून नाशिकसाठी नुकतीच ई-शिवाई बससेवा सुरू करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत या मार्गावर चार गाड्या धावत आहेत. त्यानुसार, पहिली बस सकाळी सहा वाजता जळगाव स्थानकावरून सुटते. ही बस विनाथांबा थेट नाशिकपर्यंत जात असल्याने प्रवाशांना कमी वेळात नाशिकला पोहोचणे शक्य होत आहे. याशिवाय, सकाळी नऊ, दुपारी दीड आणि चार वाजता जळगावहून नाशिकसाठी ई-शिवाई बस सोडली जाते. जळगाव ते नाशिक ई-शिवाई बसचे पूर्ण तिकीट ६९३ रूपयांपर्यंत आहे.

दरम्यान, वाढती मागणी लक्षात घेता जळगाव विभागात ई-शिवाई बससेवेचा दुसरा टप्पा राबवण्याची तयारी वेगात सुरू झाली आहे. या टप्प्यात एकूण ९९ इलेक्ट्रीक बस दाखल होणार असून त्यापैकी ३५ बसेस जळगाव आगारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित बस पाचोरा, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या तीन आगारांमध्ये वाटप केल्या जाणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now