जळगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल लंपास

नोव्हेंबर 25, 2025 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नसून यातच बाजार समितीच्या एमआयडीसीतील गुरांच्या बाजारातील सहा दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोडली. यामध्ये तब्बल ६ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरी करताना चोरट्यांनी तोंडाला कापड बांधले असले तरी, त्यांची ही संपूर्ण करामत काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

चोरट्यांनी अत्यंत धाडसाने आणि पद्धतशीरपणे गुरांच्या बाजाराजवळील दुकानांना लक्ष्य केले. फिनाईल पुरवठा, बेकरीचा कच्चा माल आणि इतर वस्तूंच्या दुकानांमध्ये ही चोरी झाली. नोमान शकील देशमुख यांच्या न्यू भारत केमिकलमधून सर्वाधिक २ लाख ७५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली. तर, राजेंद्र टेकचंद अग्रवाल यांच्या श्रृती इन्टरप्राईजेसमधून २ लाख ५० हजार रुपये रोख आणि चांदीचे नाणे चोरट्यांनी पळवले. याशिवाय, रामकृष्ण पाटील (रोख ४५ हजार), सुनील काकानी (रोख ३० हजार), सचिन चौधरी (रोख १५ हजार) आणि सुकलाल पवार (रोखंडी तिजोरीतून रोख २८ हजार) यांच्या दुकानातूनही लाखोंची रोकड लंपास झाली.

चोरीची घटना चित्रीत होऊ नये म्हणून चोरट्यांनी दुकानांवरील तीन ते चार सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोंडाला कापड बांधलेले तीन चोरटे काही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. एकाच रात्री सहा दुकाने फोडल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नोमान देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now