जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२५ । जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळावरून नवी दिल्लीसह इंदूर, सुरत आणि नागपूरसाठी स्वतंत्र विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन असून त्याच दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत.

जळगाव विमानतळावरून सध्या उडान योजनेंतर्गत गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर आता नवी दिल्ली, इंदूर, सुरत आणि नागपूर या मोठ्या शहरांना जळगावशी जोडण्यासाठी इंडीगो आणि स्टार एअर कंपनीने विमानसेवा सुरू करावी म्हणून लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विमानतळ परिसराची पाहणी करून सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि नागरिकांसाठी आवश्यक सुधारणा याबाबतची माहिती घेतली. विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी यांच्याशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
दरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने विमानतळाच्या विस्तारासाठी तब्बल ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीच्या मदतीने पुढील वर्षभरात विविध विकासकामे पूर्ण केली जाणार असून, त्यामुळे विमानतळाची सुविधा, सेवा आणि प्रवासी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जळगाव शहराचा प्रादेशिक विकास आणि हवाई संपर्क दोन्ही अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









