जळगाव लाईव्ह न्यूज । नंदुरबार जिल्ह्यात एक अपघाताची मोठी घटना समोर आलीय. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम आमलीबारीजवळील देवगोई घाटात जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ५३ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी १८ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जगदीश बहादूसिंग वळवी (वय १२, रा. निंबिपाडा), कपिला जहांगीर राऊत (११, रा. काठी, ता. अक्कलकुवा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

दिवाळीच्या सुट्यांमध्ये आपल्या गावाकडे आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेवून ती बस अक्कलकुवाकडे परतत असतानाच, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं ही बस थेट दरीत कोसळली. बस अपघात झाला त्यावेळी बसमध्ये विद्यार्थ्यांसह एक शिक्षक, एक परिचर असे ५७ जण होते.

यातील जगदीश वळवी व कपिला राऊत या दोन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी दरीत जावून मदत कार्य करत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंतर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलुकवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात पालकांनी एकच गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रोश केला.












