जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२५ । गेल्या दोन आठवड्यापासून धुमाकूळ घातलेल्या अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून उघडीप दिली आणि ढगाळ वातावरण कमी झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून आला असून दिवसा उन्हाचा हलकासा चटका जाणवत असून तर सकाळच्या वेळेस धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. धुक्याची चादर पसरल्याने जळगावकरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

दिवाळीपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट कायम होते. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामावर माती फिरवली. पावसामुळे कापूस भिजून निघाला तर काढून ठेवलेल्या मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान झाले. त्यामुळे वातावरण निवळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. यातच मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली.

पावसाची स्थिती कमी होऊन ढगाळ वातावरण कमी झाल्यामुळे कोरडे वातावरण तयार झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांना आता काही प्रमाणात सक्रिय होण्यास मदत मिळाली आहे. या बदलाचा परिणाम मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी दिसून आला. जळगाव शहरातील उपनगरांच्या आसपास आणि तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली होती.
धुक्यामुळे सकाळी लवकर सूर्योदय होऊनही सूर्य दर्शन होण्यासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. दृश्यमानता ३० ते ५० मीटरपर्यंत खाली आली होती. धुक्याची चादर पसरल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ६ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.









