कोरोना

जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यात सक्रीय रुग्ण संख्या पन्नासच्या आत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या 1733 पर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या 100 च्या आत तर चार तालुक्यात 50 च्या आत आली ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जळगाव जिल्हा अनलॉकच्या टप्पा-1 मध्ये असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हावासियांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या 12 हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवून बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेणे, कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करणे आदि उपाययोजना तातडीने राबविल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 12 हजारपर्यंत गेलेली सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून ती आता 1733 पर्यंत खाली आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणी सक्रीय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती तर उर्वरित तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहोचली होती.  मात्र सध्या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या ही शंभरच्या आत आली असून चार तालुक्यात ही रुग्ण संख्या 50 पेक्षाही कमी झाली आहे. तर जळगाव शहरासह भुसावळ, एरंडोल, रावेर, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यात रुग्णसंख्या 100 पेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे रोखण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलीस व महसुल प्रशासनासह आरोग्य व इतर शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभत असून नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण

जळगाव शहर-152, जळगाव ग्रामीण-79, भुसावळ-165, अमळनेर-45, चोपडा-55, पाचोरा-94, भडगाव-30, धरणगाव-24, यावल-83, एरंडोल-201, जामनेर-144, रावेर-105, पारोळा-46, चाळीसगाव-377, मुक्ताईनगर-61, बोदवड-53 व इतर जिल्ह्यातील-19 असे एकूण 1 हजार 733 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button