जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरीआजींचा जन्म १ एप्रिल १९३४ रोजी यावल तालुक्यातील सांगवी येथे तळेले कुटूंबातील श्री. एको धना तळेले आणि सौ. मथुराबाई एको तळेले या दांम्पत्याच्या पोटी जन्म झाला. तसे त्यांचे मुळचं घराणं सातोदचं. त्यांचे वडील सालदार होते. माझी आई मथुरा सुद्धा खूप हुशार, मेहनती व मनमिळावू होत्या. १९३० च्या दशकात ज्यावेळी भारतात शिक्षणाचं त्यातच मुलींच्या शिक्षणाचं फारसं महत्व नव्हते, त्यावेळी त्यांची आई सहावी शिकलेली होती. गोदावरीआजी सहा महिन्यांची असतांना त्यांचे पित्रूछत्र हरपलं. त्यांचे आजोबा सांगवी गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती होते.

आईसमोर पतीचे निधन झाल्यावर घरी शेती नसल्यानं तीन मुलांसमवेत उर्वरित आयुष्य कसं जगावं हा यक्ष प्रश्न होता. परंतु आजोबांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहून मुलीला स्वत:च्या घरी सांगवी येथे नेलं आणि मुलांसोबत त्यांची जबाबदारी घेतली आणि त्या आईसमवेत आजोळ असलेलं सांगवी गावी राहावयास गेल्या. त्यांचे आजोबा श्री. नारायण सुका वायकोळे ह्यांनी आपल्या मुलीसह नातवंडांचाही उत्तमरित्या सांभाळ केला. त्यांचे बालपण पाचवी ते सहावीपर्यंत आजोळी गेलं. असं म्हणतात ना संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत नि:स्वार्थी मदत आणि मार्गदर्शन करणारे असतील तर मार्ग नक्कीच सापडतो व सुकर होतो.

अगदी तशीच मदत व मार्गदर्शन आजोबा आणि मामांकडून वेळोवेळी मिळत राहिली. आईला मदत व्हावी म्हणून त्या रविवारी सुट्टीच्या दिवशी शेतात जायच्या आणि आईला शेतीकामात मदत करायच्या. त्यांच्या आईला शाळा बुडवणे अजिबात चालत नसे. ज्या काळात स्त्रियांच्या शिक्षणाला फारसं महत्व नव्हतं. त्या काळी त्यांच्या आईचं त्यांना शिकवणं निश्चितच कौतुकास्पद होतं. त्या काळी स्त्रियांचं क्षेत्र केवळ चूल आणि मूल या पेक्षा व्यापक नव्हतं. मात्र स्वत:वर ओढवलेला प्रसंग लक्षात घेऊन आईनं गोदाआजींना स्वत:च्या पायावर उभं करायचं ठरवलं होतं. तसं त्यांनी त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलं होतं. गोदावरीआजींनाही शिक्षणाची आवड होती आणि त्यामुळेच त्या पुढे शिकू व प्रगती करू शकल्या.
गोदावरीआजी शाळेत असतांना विविध उपक्रमात भाग घेत असत. इयत्ता ७ वीत असतांना शाळेत एकदा वाद-विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा रावेर, यावल तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी होती. स्पर्धेचा विषय होता, कुलीन स्त्रियांनी नाटकात भाग घ्यावा की घेऊ नये. त्यात गोदावरीआजीं सुद्धा भाग घेण्यासाठी नाव दिले होते. त्यांचा विषय “कुलीन स्त्रियांनी नाटकात भाग घ्यावा” असा होता. त्याच त्यांचा दुसरा नंबर आला होता.
सांगवी येथील मराठी शाळेतील शिक्षक नेहमी गोदावरीआजींचे कौतूक करत असत शिक्षकांच्या सांगण्यावरुनच त्यांच्या आईंनी पुढे शिकण्यासाठी जळगावला अध्यापक विद्यालयात पी. टी. सी. च्या ट्रेनिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण त्या काळात ७ वी पास झाल्यावर शिक्षकाची नोकरी लागत असे, त्यासाठी ज्युनिअर पी.टी.सी.चं ट्रेनिंग घेणं अनिवार्य होतं. हा प्रवास पूर्ण करुन त्या शिक्षिका झाल्या. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर साधारणत: ९ – १० महिन्यात त्यांचं लग्न वासूदेव गुरुजींशी झाले. गोदावरीआजी व वासूदेव गुरुजींच्या पोटी पहिले कन्यारत्न जन्मले. त्यांचं नाव प्रमिला ठेवले. त्यानंतर त्यांच्या जीवनात सुभाष व उल्हास ही दोन फुलं उमलली. गोदावरीआजी केवळ मॅट्रिकपर्यंत थांबल्या नाहीत त्यांनी पुढे डी.एड.देखील पुर्ण केलं. मुलांचं शिक्षण सुरु असतांना त्यांचे पती वासूदेव गुरुजींचे अचानक निधन झाले. त्यानंतरही गोदावरीआजी खचल्या नाहीत. मोठ्या हिंमतीने तिन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण केलं.
शाळेत शिक्षिका म्हूणन जबाबदारी पेलत दोघं मुलांनाही उच्चविद्याविभूषित केले. आई आणि बाबा दोघांचीही माया, प्रेम आणि आधार एकटीनंच मुलांना दिला. वाईटामागून चांगले दिवस येत गेले, मुलांनीही परिस्थितीची जाणीव ठेवली आणि त्यांनी आईमध्येच बाबांनाही पाहिलं. मुलं स्वत:च्या पायावर उभे राहिले. अर्थात हा प्रवास फार सोपा नव्हता. मात्र परिस्थिती सर्वकाही शिकवते… तब्बल ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या शिक्षकीपेशातून सेवानिवृत्त झाल्या. एक आदर्श आई बरोबरच एक आदर्श शिक्षिकेचीही भूमिका पार पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
गोदावरीआजी त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने डॉ. उल्हास पाटील यांना जीवनात प्रेरणा मिळाली. त्यांनी कुटुंब आणि समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे त्या सदैव स्मरणात राहतील. गोदावरी आईंच्या निधनाने डॉ. उल्हासदादा पाटील, सुभाषदादा पाटील आणि प्रमिलाताई यांच्यासह संपूर्ण गोदावरी परिवारावर शोककळा पसरली आहे. आपल्या पाठीशी असलेल्या माऊलीचा हात अचानक निघून जाणे हे कोणत्याही लेकरासाठी अत्यंत वेदनादायी असते. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो आणि पाटील परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी जळगाव लाईव्हतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना!








