Jalgaon : 2500 रुपये प्रति क्विंटलच्या केळीला मिळतोय आता अवघा ‘इतके’ रुपये दर? उत्पादक शेतकरी संकटात

सप्टेंबर 3, 2025 4:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । एकीकडे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून यातच व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दीड महिण्यापुर्वी २४०० रुपये क्विंटलवर असलेला केळीचा दर आता अवघे ५०० ते ५५० रुपये क्विंटलपर्यंत घसरले आहेत. गेल्या सहा वर्षांतील केळी भावाची ही सर्वांत नीचांकी पातळी असून या घसरलेल्या भावाबद्दल शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर आरोप करत संताप व्यक्त केला.

banana 1 jpg webp

अनेक व्यापारी या घसरणीसाठी अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचे कारण देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात जळगावमधून निर्यात होणारी केळी अरब राष्ट्रांमध्ये जातात. त्यामुळे या टॅरिफचा कोणताही संबंध नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. केवळ टॅरिफचे कारण पुढे करून व मागणी नसल्याचे कारण देत हे दर पाडले जात आहेत.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात केळीचे भाव २४०० रुपये क्विंटल होते. १५ जुलैला केळी भावाने २५०० रुपयांचा टप्पा गाठला. दर्जेदार आणि निर्यातक्षम केळीला त्यावेळी क्विंटलला तीन हजार रुपयेही भाव मिळत होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाव उतरण्यास सुरुवात झाली आणि दीड महिन्यातच केळी भावाने तळ गाठला. सध्या चांगल्या दर्जाच्या केळीला ९०० ते हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असला, तरी सामान्यपणे ५०० ते ६०० रुपये क्विंटल भावानेही शेतकऱ्यांना आपली केळी विकावी लागत आहे. सध्या गुजरात, मध्य प्रदेश, सोलापूर या भागातूनही मोठ्या प्रमाणात केळीची कापणी सुरू असल्याने खानदेशी केळीची मागणी तुलनेने कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे भाव घसरले असल्याचा दावाही त्यांनी केला.

व्यापाऱ्यांनी भाव पाडले

दरम्यान, व्यापारी मंडळींनी मुद्दाम केळीचे भाव पाडून लूट चालवली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. एवढ्या कमी भावात केळीचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही, मात्र, केळी नाशवंत फळ असल्याने आठवड्यापेक्षा जास्त काळ ते बागेत राहू देऊ शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने मिळेल त्या भावात केळी कापून द्यावी लागते, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now