जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । सणासुदीत देशातील सामान्य नागरिकांना आणि लहान व्यापाऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडेरची किंमत ५१.५० रूपयांनी स्वस्त झाली आहे. नवीन दर आज १ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्यांकडून गॅस सिलिंडर दरात बदल जाहीर केले जातात. त्याच प्रमाणे आज १ सप्टेंबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर ५१.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. सलग तिसरा महिना आहे जेव्हा तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यापूर्वी १ ऑगस्ट रोजी ३३.५० रुपये आणि १ जुलै रोजी ५८.५० रुपये कपात करण्यात आली होती. जूनमध्येही २४ रुपयांच्या कपातीनंतर ही किंमत १७२३.५० रुपये होती. एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत १,७६२ रुपये होती, तर फेब्रुवारीमध्ये ७ रुपयांची थोडीशी कपात आणि मार्चमध्ये ६ रुपयांची वाढ दिसून आली.

आजच्या दर कपातीनंतर एक सप्टेंबरपासून राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाचा गॅस सिलिंडरची किंमत १५८० रूपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये हा सिलिंडर १३३४.५० रूपयांना मिळेल. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १९ किलो वजनाचा गॅस सिलिंडर १५८२.५० रूपयांवरून १५३१.५० रूपये इतकी किंमत झाली आहे. चेन्नईमध्ये हा गॅस १७३८ रूपयांना मिळेल. १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाल्याचा फायदा हॉटेल, रेस्टारंट, ढाबा आणि अन्य व्यावसायिकांना होणार आहे.
दरम्यान, व्यावसायिक गॅसच्या किंमती सातत्याने कमी होत असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मागील चार ते पाच महिन्यापासून गॅसच्या किंमती जैसे थे आहेत. सध्या १४ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर ८५२.५० रूपयांना मिळतोय.











