जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धराली गावात ढगफुटी झाली त्यानंतर झालेल्या भूस्खलनानंतर मातीच्या मलब्याखाली शेकडो घरं आणि दुकाने दबली आहेत. दरम्यान उत्तरकाशी दुर्घटनेत अडकलेले जळगाव शहरातील अयोध्यानगरमधील तीनही भाविक सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नेटवर्कच्या समस्येमुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत होत्या, मात्र आता त्यांच्या सुखरूप असल्याची खात्री पटली आहे.

धारली हा उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्याचा एक भाग असून गंगोत्रीला जाणाऱ्या लोकांसाठी ही दरी एक महत्त्वाची थांबा आहे. तिथेच काल ढगफुटीची मोठी दुर्घटना घडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले आहे. या ठिकाणी शहरातील अयोध्यानगरमधील काही भाविक अडकल्याची माहिती समोर आलीय. जिल्हा नियंत्रण कक्षाने उत्तरकाशी येथील ‘माऊंट भागीरथी होम स्टे हर्षिल’ या निवासस्थानाशी संपर्क साधला. त्यावेळी, मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे तिन्ही जळगावचे भाविक सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले.

सदर भाविकांचे वडील चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कशात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.यामुळे मेहरा कुटुंबासह जळगावकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव, या संदर्भात सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.








