जळगावात पावसाची दडी ! तापमान वाढले, दमदार पावसासाठी ‘या’ तारखेपर्यंत पाहावी लागणार वाट?

ऑगस्ट 4, 2025 2:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२५ । सध्या जळगावसह राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने ब्रेक घेतला असून दुसरीकडे तापमानात वाढ झाली आहे. मागच्या पाच दिवसात तापमानात ६ अंशापर्यंतची वाढ झालीय. पाऊस सुट्टीवर गेल्याने बळीराज संकटात सापडला आहे. दरम्यान यंदा जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाची तब्बल ३७ टक्के तूट राहिली आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात जुलै महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. आता दमदार पावसाची जळगावकर प्रतीक्षा करत असून मात्र दमदार पावसासाठी जळगावकरांना अजून १५ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

rain farmer jpg webp

जळगाव जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यांत सर्वाधिक १९६ मिमी ऑगस्ट महिन्यात पाऊस होतो, त्यानंतर १८९ मिमी पाऊस हा जुलै महिन्यात होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला आहे. २०२४, २०२३ व २२ या वर्षामध्ये २०० मिमी पेक्षा अधिकचा पाऊस जुलै महिन्यात झाला. मात्र, यंदा जुलै महिना कोरडाच गेला आहे. जुलै महिन्यात यंदा केवळ १२० मिमी पाऊस झाला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सातत्याने अस्थिर असल्याने मान्सून सक्रिय होण्यात अडचणी येत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावल्याने तापमान ३० अंशाखाली गेले होते. मात्र आता पावसाने ब्रेक घेताच तापमानाचा पाराही वाढला आहे.

गेल्या आठवड्याच्या बुधवारी २७ अंशांवर असलेल्या तापमानाचा पारा काल रविवारी ३३ अंशांवर पोहोचला.आर्द्रता ६० टक्क्यांच्या पुढे असल्याने उकाडा वाढला आहे

पावसासाठी पाहावी लागणार वाट ?

दरम्यान श्रावण महिना सुरू असला, तरी यंदाचा श्रावण महिना कोरडाच जाण्याची शक्यता आहे. कारण, अजून आठवडाभर तरी जळगाव जिल्ह्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पावसासाठी पोषक अशी स्थिती निर्माण होताना दिसत नाही. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात १५ ऑगस्टनंतरच दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now