जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२५ । राज्यभरात शुक्रवारी ठिकठिकाणी मुसळधार ते रिमझिम पावसाने दमदार हजेरी लावली. गत काही आठवड्यांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान आज राज्यभरात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष आज (दि २६ जुलै) जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने आज राज्यातील चार जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर तब्बल १८ जिल्ह्यांना मुसळधारचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरीत जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाआज पालघर, पुणे घाटमाथा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला.

तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला.
तसेच नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगावकरांची जोरदार पावसाची प्रतीक्षा संपणार
जळगाव जिल्ह्यात मागच्या दोन तीन दिवसापासून अधून मधून पावसाने हजेरी लावली. मात्र जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. जुलै महिना कोरडाच गेल्याने आणि पावसाचा खंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आगामी दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून आज शनिवारी जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, त्यानंतर पुन्हा काही दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवल्याने, शेतकऱ्यांच्या चिंता पूर्णपणे मिटलेल्या नाहीत. आता बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.








