जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्हीही ज्वारीला भाव नसल्याने साठवून ठेवली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण जळगाव बाजार समितीमध्ये ज्वारीच्या भावात अचानक वाढ झाली आहे. तीनच दिवसात ज्वारीच्या दरात ११०० रुपयांची वाढ झाली आहे. Jalgaon Sorghum prices

सोमवारी २२०० रुपये क्विंटल एवढा भाव असलेल्या ज्वारीचा दर गुरुवारी ३ हजार ३७१ रुपयांवर पोहोचला होता. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी भाव नसल्याने ज्वारी साठवून ठेवली आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच दिलासा आणि आनंदाची बातमी ठरेल.

दरम्यान, एकीकडे पावसाळा सुरु असून देखील बाजार समितीत शेतमालाची कमी-जास्त प्रमाणात आवक सुरूच आहे. सोमवार, १४ जुलै रोजी ज्वारीची केवळ २ क्विंटल एवढी आवक होती. गुरुवारी मात्र बाजार समितीत तब्बल ७६४ क्विंटल एवढी आवक होती. विशेष म्हणजे आवक वाढल्यानंतर दरात घट होत असते. मात्र, बाजार समितीत आवक वाढल्यानंतर दरात वाढ झालेली दिसून येत आहे. Sorghum Rate Jalgaon
हे आहेत ज्वारीच्या दरवाढीचे कारण?
ज्वारीचे अचानक भाव वाढीमागे सध्या ज्वारीची सुरू असलेली शासकीय खरेदी हे कारण आहे. शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदीवर आपला माल विक्री करण्यावर आहे. त्यामुळेच व्यापाऱ्यांकडे माल येत नाही, त्यामुळे जो माल येत आहे, तो माल जास्त भावात खरेदी करण्यावर भर असल्याचे कारण बाजार समितीच्या सचिवांनी दिले.
ज्वारीला चांगला भाव मिळत असताना, तुरीचे दर मात्र हमीभावापेक्षा कमी असल्याचे चित्र आहे. तुरीचा हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल असला तरी, १६ जुलै रोजी बाजार समितीत तुरीची आवक ३८ क्विंटल असून, भाव केवळ ४९०० रुपये प्रति क्विंटल होता. सद्यःस्थितीत तुरीला बाजारात मागणी नसल्यामुळे दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे.
असे आहेत दर (१७ जुलै)
हरभरा चाफा -५६०० क्विंटल
हरभरा चिणोली – ५१०० क्विंटल
दादर- २७०० क्विंटल
सोयाबीन – ४१०० ते ४२०० क्विंटल
ज्वारी – ३३७१ क्विंटल









