जामनेर हादरले ! जन्मदात्या बापाकडून दारुड्या मुलाचा खून

जून 23, 2025 8:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२५ । सततच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या बापाने आपल्याच मद्यपी मुलाची डोक्यात दगड टाकून निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथे घडली. शुभम सुरडकर (२५) असं खून झालेल्या तरुणाचे नाव असून हत्येनंतर मृतदेह निर्जन रस्त्यावर टाकून हा प्रकार अपघाताचा किंवा बाहेरील व्यक्तीने केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पित्यासह तिघांना अटक करण्यात आली असून फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

shubham

नेमकी घटना काय?
कसबा पिंपरी येथे धनराज सुपडू सुरडकर हे आपल्या पत्नी आणि शुभम आणि गौरव या दोन मुलांसह राहतात. त्यांचा मोठा मुलगा शुभम सुरडकर विवाहित होता, परंतु त्याला गेल्या काही महिन्यांपासून दारूचे प्रचंड व्यसन होते. शुभम हा सतत दारू पिऊन त्रास देत होता. त्याच्या या रोजच्या त्रासाला संपूर्ण कुटुंब कंटाळले होते. चार दिवसांपूर्वी शुभमच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती.

दरम्यान, २१ रोजी शुभम घरात झोपला असतांना वडील धनराज सुरडकर यांनी शुभमच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर हा प्रकार दडपण्यासाठी वडील धनराज सुरडकर आणि त्यांचा लहान मुलगा गौरव सुरडकर यांनी मिळून शुभमचा मृतदेह मध्यरात्रीनंतर फत्तेपूर-पिंपरी येथील निर्जन बायपासवर आणून टाकला. कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने खून केल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

शुभमचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडच्या तपासानंतर पोलिसांचा संशय कुटुंबीयांवरच वाढला. तपास अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी घराची तपासणी केली असता, खुनाचा सर्व प्रकार स्पष्ट झाला. या प्रकरणी धनराज सुरडकर, मुलगा गौरव सुरडकर आणि काका हिरालाल सुरडकर या तिघांना अटक करण्यात आली असून फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment